बळीराजा पुन्हा चक्रव्युव्हाच्या कैचित...
मारेगाव तालुक्यात पुरामुळे चौथ्यांदा शेतजमिनी पाण्याखाली
🔸शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका
🔸बेंबळा प्रकल्प ठरतोय पांढराहत्ती
🔸मारेगाव तालुक्यात अस्मानी ,सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या शिरावर
मारेगाव : दीपक डोहणे
तालुक्यातुन जाणारा बेंबळा प्रकल्प शेतकऱ्यांच्या मानगुटीवर कायम बसून असतांना एक दोन नव्हे तर चक्क चौथ्यांदा शेतजमीनीला पुराचा फटका बसत असल्याची विदारक परिस्थितीत शेतकरी मेटाकुटीस आला आहे.मारेगाव तालुक्यातील किमान दोनशे हेक्टर शेती पुन्हा पाण्याखाली गेली असल्याने सरकार मात्र मदतीसाठी तोंडात बोटे घालून असल्याने शासनाप्रती शेतकऱ्यांत प्रचंड संताप व्यक्त होते आहे.
तालुक्यातील छोटे मोठे नाले सह वर्धा नदीच्या तिरालगत असलेल्या शेतजमिनी यंदाच्या पहिल्या अतिवृष्ठीसह पुराने शेतजमिनी खरडून गेली.शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने पुरता मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याने कशीबशी व्यवस्था करून दुबार पेरणी केली.मात्र बेंबळा प्रकल्पाचे पुन्हा दरवाजे उघडल्याने पुराचे चक्र फिरत राहिले.तब्बल चौथ्यांदा हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून उरले सुरले उभे तुरीचे पीक पुन्हा पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.त्यामुळे बेंबळा प्रकल्पच आता शेतकऱ्यांसाठी पांढरा हत्ती ठरत आहे.
दरम्यान , राळेगाव तालुक्यातील खैरी, मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ , दापोरा , शिवणी , दांडगाव , गोरज , आपटी आदी गावातील जवळपास २०० हेक्टर शेतजमिनी हल्ली पाण्याखाली असल्याचे भयाण वास्तव आहे.
तूर्तास कोसारा , दापोरा पुलावरून किमान चार फूटा वरील पाण्याची पातळी वाढली आहे.त्यामुळे येथील मार्ग बंद आहे. सततच्या अतिवृष्ठीने व पुराने येथील बळीराजा हतबल झाला आहे.यापूर्वीच्या पुराने जबर फटका बसला असतांना आता पुन्हा चौथ्यांदा शेतजमिनीला पाण्याने वेढा घातला आहे.शासनाकडून मदतीचा ओघ अजूनपर्यंत मिळाला नसल्याने अस्मानी सुलतानी संकट शिरावर घेत शेतकरी पुरता चक्रव्यूव्हाच्या कैचित सापडला आहे.