शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना दिलासा..
जिल्हाधिकारी अमोल येडगे आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या दारी
🔸मारेगाव तालुक्यात दिली एक लाखाची मदत
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज गुरुवारला मारेगाव तालुक्यातील चार शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. जिल्हा प्रशासन व शासन आपल्या सोबत असल्याचे सांगत एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे सूतोवाच केले.
मारेगाव तालुक्यात जुलै - ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी, महापूर यामुळे शेतापिकांचे मोठे नुकसान होऊन शेतजमीन खरडून गेली. परिणामी, तालुक्यात सलग आत्महत्येची मालिका सुरू असतांना तालुका पुरता प्रभावित झाला होता. याची गंभीर दखल घेत तालुका प्रशासनाने "एक दिवस माझ्या बळीराजासाठी"हा उपक्रम राबवित गावागावात जनजागृती राबविली.
दरम्यान , तालुक्यातील सलग शेतकरी आत्महत्येची गंभीर दखल घेत आज दि.२२सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मारेगाव तालुक्यातील जीवनयात्रा संपविलेल्या शेतकरी पुंडलीक रूयारकर बोरी गदाजी, तोताराम चिंचुलकर दांडगाव सुधीर गोलर पांढरकवडा (पिसगाव), गजानन मुसळे नरसाळा या कुटूंबाच्या घरी थेट भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. शासन-प्रशासन खंबीर पणे पाठीशी असल्याचे सूतोवाच करीत १लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. तसेच शासनाच्या विविध योजना शेतकऱ्या पर्यंत पोचविण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी अतिवृष्टीमुळे शेतापिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, तहसिलदार दीपक पुंडे, तालुका कृषी अधिकारी सुनिल निकाळजे यांचेसह तालुका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.