खा.बाळूभाऊ तुम्ही इथेच चुकलात.......
🔸मारेगावात कांग्रेसचे वरून कीर्तन,आतून गोंधळ
प्रासंगिक✍️:-दिपक डोहणे
साऱ्या भारत देशात कांग्रेस सध्या "बुडत्याचे पाय डोहात" या म्हणीचा पुरेपुर अन भरपुर असा अनुभव घेत आहे. कांग्रेस पुन्हा एकदा पुनर्जीवीत व्हावी यासाठी राहूल गांधी भारत जोडो पदयात्रा काढून जीवाचे रान करीत आहे. अशात महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदारसंघातून केवळ एक खासदार म्हणून निवडून आलेल्या बाळूभाऊ धानोरकर यांना आणि कांग्रेस पार्टीला येथील सामान्य जनतेप्रति अधिक जागरूक आणि संवेदनशील होणे खूप आवश्यक आहे असे वाटते.परंतु दुर्दैवाने ही जागरूकता म्हणावी तशी ना बाळूभाऊ अन ना कांग्रेस संगठनात दिसत आहे.हे पक्षासाठी धोकादायक वाटचाल ठरत आहे.
आपण सार्वजनिक जीवनात कसेही वागलो,काहीही कोलांटउडी घेऊन निर्णय घेण्यात आले तरी जनता आपल्या पाठिशीच मूर्खपणे उभी राहणार हे भ्रम ठेऊन राजकारण करण्याचे दिवस कधीचेच निघून गेलेत.
मारेगाव तालुका पूर्वीपासून कांग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे.भाजपा चे दिग्गज हंसराजभैय्या अहिर यांना पराभूत करून धानोरकर हे राज्यातून एकमेव कांग्रेस चे खासदार निवडून आले.मारेगावातून त्यांना भरपूर लीड मिळाली.अश्यावेळी जनतेला घेऊन चालणे आवश्यक असतांना खासदार आणि कांग्रेस यांनी मारेगाव मध्ये उपटसुंभ चुका करण्याचा जणू काही सपाटाच लावला आहे,असे दिसून येत आहे.
मारेगाव नगर पंचायत मध्ये १७ पैकी सर्वाधिक ५ नगरसेवक निवडून आले.महाविकास आघाडी सरकारच्या धर्तीवर इथेही युती होऊन सत्ता स्थापन करण्याची ताकद असतांना कांग्रेसच्या इतरांना झुंजझुना देऊन ऐनवेळी कांग्रेसशी बंडखोरी करून निवडून आलेल्या अधीर पोराला नगराध्यक्ष करिता लाँच करणे खासदारांना चांगलेच भोवले.या अकल्पित अन तकलादू निर्णयाला दोन कांग्रेसी नगरसेवकांनी कचरा पेटीची वाट दाखवून आम्ही तुमच्या खुंटीला बांधलेली गाय नाही हे दाखवून दिले.कांग्रेस हरली.मोठया पॅकेज ची देवाण घेवाण होऊन नगराध्यक्ष लादला गेला असाही सूर कांग्रेसी गोटातुन खूप चर्चिला गेला.पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची सवय लागलेले कांग्रेस कार्यकर्ते काहीच करू शकले नाही.जनता मात्र हा थट्टा,तमाशा मुकाट्याने बघत राहिली.समजून उमजून चुकली.लोकं तेवढी दुधखुळी नसतातच हो कधी.
कांग्रेस आता पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधून बलिशपणा करायला जणू उतावीळ झाली आहे.उद्या खासदार बाळूभाऊ लोकं हसतील असा कार्यक्रम सादर करून पुन्हा जनतेला गृहीत धरणार आहे.नगर पंचायत च्या चार प्रभागात 19 सप्टेंबर ला सिमेंट रस्ता इत्यादि कामाचे स्थानिक विविध मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झाले.नेहमीच्या बालिश बच्चे अन भाऊ-भाऊ म्हणून हुजरेगिरी करणाऱ्या उताविळाना ही बाब खटकली.राजकारणाला बिजनेस बनविणाऱ्या इथल्या दोन चार कार्यकर्त्यांनी भाऊच्या कानात कुजबुज केली.हा आपल्या इज्जतीचा अवमान आहे हे भाऊला पटवून दिले.नवल म्हणजे भाऊंनी देखील पटवून घेतले. दिल्लीतील संसद सदस्य असणाऱ्या बाळूभाउनी साध्या गल्लीतील रस्त्याचे भूमिपूजन खूपच मनाला लावून घेतले. या क्षुल्लक कामांना त्यांनी राजकीय प्रतिष्ठतेचा अपमान समजून पुन्हा घोडचूक केली आहे.एकदा भूमिपूजन होऊन सुरू झालेल्या थिल्लर कामाचे बाळूभाऊ पुन्हा उद्या गुरुवारी दुसऱ्यांदा भूमिपूजन करणार आहेत.त्यांची सोशल मीडियावर पत्रिका फिरत आहे.त्यासाठी गाडलेले फलक पुन्हा उपटून नेऊन त्यावरील नावे बदलुन लिहिण्यात आली आहेत.जिल्हाधिकारी पासून स्थानिक अधिकारी यांची कानें भाऊंनी गरम केली आहेत.जनता उघड्या डोळ्यासमोर हा पोरखेळ बघत आहे,हसतही आहे.त्यांच्या या अजब भूमिकेने चारदोन उतावीळ सोडले तर इतर कांग्रेसी नेतेही वैतागून,अचंबित होऊन बघत आहेत. ज्या बहुजन, अल्पसंख्याक, अन दलित मतांवर बाळूभाऊ अन त्यांच्या कांग्रेसची भिस्त असते,त्यांचाच जणू अपमान करण्याचा चंग बाळूभाऊनी घेतलेला दिसतोय.
प्रभाग क्रमांक ११ मध्ये राजकारण चा काहीएक घेणंदेन नसलेल्या बौद्ध धर्मगुरू करूनाबोधी यांनी १९ सप्टेंबरला भूमिपूजन केले,जणू त्यांचा अवमान करायचा हा संदेश देत खा.बाळूभाऊ पुन्हा त्याच कामाचेही भूमिपूजन करणार आहे. नाव बाळूभाऊ असले तरी असला बलिशपणा करायचा नसतो. निदान कांग्रेसची तरी तशी परंपरा नाहीच.किमान आपण लाखों लोकांचं संसदेत प्रतिनिधित्व करतोय हा भान खासदार यांना असणे अभिप्रेत असतो. म्हणूनच कांग्रेस इथेच चुकते.दोन चार छुटभय्ये कार्यकर्ते म्हणेल तसे वागावे हे निदान खासदारांना शोभून दिसत नाहीच अन दिसूही नये अन्यथा येणारा काळ कांग्रेससाठी धक्क्यावर धक्के घेऊन येईल हे सांगायला कोण्या ज्योतिष्याची गरज नाही एवढे मात्र खरे........!