मारेगाव तालुक्यातील ग्रा.पं. निवडणूक निकाल जाहीर..
११ ग्रा.पं. चे जनतेतून झाले "कारभारी"
🔸गुलाल उधळून समर्थकांनी केला जल्लोष
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील ११ ग्रामपंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज सोमवारला तहसील कार्यालय येथे घोषित करण्यात आला.यात पहिल्यांदाच ग्राम पातळीवरील ' कारभारी ' ( सरपंच )जनतेतून निवडण्यात आले.११ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत अनेक ठिकाणी चुरशीची लढत झाली.बहुतांश ग्रामपातळीवर पॅनल ला धोबीपछाड देण्यात आला.प्रस्थापितांना डावलून जनतेंनी नवागतांना संधी दिल्याचे दिसून आले.
मारेगाव तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच इंच्छुकांनी निवडणूक रिंगणात उडी घेत बऱ्याच ठिकाणी रंगत आणली.११ ग्रामपंचायत निवडणुकीत ७७ नवनियुक्त सदस्यांची एन्ट्री झाली.याती काही ठिकाणी अविरोध सदस्य नियुक्त झालेत.
दरम्यान , सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवड असल्याने अकरा ही ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत भाऊ गर्दी दाटली होती.गाव पातळीवरील प्रथम नागरिकांचा बहुमान पदरी पाडण्यासाठी अनेक ठिकाणी चुरशीची लढत झाली.यावेळी ग्रामपातळीवरील राजकीय रणांगण पुरते ढवळून निघाले होते.
थेट जनतेतून निवडून आलेल्या कारभारी (सरपंच ) म्हणून अर्जुनी -वंदना पुरुषोत्तम आत्राम , सगणापूर - दादाराव कपलू टेकाम, गोदणी - मंदा पांडुरंग मंडाळी , वागदरा -दादाराव पंजाब ढोबरे , वरुड - निर्मला शंकर बोंदरे , मच्छिद्रा - प्रशांत सुरेश सोयाम , डोल डोंगरगाव -शीतल संजय येरमे , कान्हाळगाव - संजय श्रावण येरने , खंडणी - दयानंद कवडू कुडमेथे , सराटी - तुळशीराम कुमरे , जळका - जोत्स्ना सुनील कुमरे यांचेवर मतदार राजांनी विश्वास टाकला.
सरपंचपदी निवडून येताच समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला.मारेगाव तालुक्यात शांततेत पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत मुख्य निवडणूक अधिकारी दीपक पुंडे यांचे मार्गदर्शनात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय वानखडे , सुधाकरराव जाधव , डी. के. जाधव यांचेसह सहयोगी म्हणून देवेंद्र चालखुरे , करण कुडमेथे , राहुल पोतराजे यांनी काम पाहिले.