आत्महत्येची धग...
शेतकरी महिलेने घेतला विषाचा घोट
🔸मारेगाव तालुक्यातील इंदिरा ग्राम येथील घटना
🔸आर्थिक विवंचनेतून संपविले जीवन
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील आत्महत्येचा आलेख दिवसागणिक वाढत असतांना आज दि.८ सप्टेंबर रोजी इंदिराग्राम येथील महिला शेतकरीने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची दुर्देवी घटना सकाळी ८ वाजता उघडकीस आली.
मीराबाई राजू आत्राम (२८ )असे आत्महत्या केलेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे.पती आणि मुलगा व एक मुलगी असा परिवार असलेल्या वडिलोपार्जित चार एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. मात्र निसर्गाच्या बेतालपणाने शेती पूर्णतः डबघाईस आली असल्याने आर्थिक विवंचना त्यांच्या नशिबी चिकटलेली होती.अशातच खासगी कर्ज शिरावर असतांना यंदा शेती ठेक्याने दिली होती.
रोजमजुरीवरही महागाईची टांगती तलवार असतांना जीवन कसे कंठावे ही अस्वस्थता शिगेला पोहचली आणि शेतकरी महिलेने आज सकाळी स्वगृही विषाचा घोट घेत जीवनयात्रा संपविली.
मारेगाव तालुक्यातील वाढत्या आत्महत्या कडे आता महिला शेतकरी सरसावत असल्याचे दुर्देवी आणि गंभीर प्रकार उजेडात येत आहे.