हृदयस्पर्शी...
आम्ही स्मशानातील दिवे...!
🔸सरण रचून टिचभर पोटाची खळगी भरतेय मायलेक
🔸मारेगावची स्मशानभूमी बनली त्यांचा निवारा
मारेगाव : दीपक डोहणे
मानवी जीवनाचं अंतीम सत्य म्हणजे 'मृत्यू' आणि मृत्यूनंतर अखेरच्या निरोपाचा अंत्यविधी केले जाते ते स्थळ म्हणजे स्मशानभूमी ! याच स्मशानभूमीची राखण करून प्रेतासाठी सरण रचून टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी मारेगावच्या स्मशानभूमीत मुलगा ज्ञानेश्वर अन त्याची आई शांताबाई या मायलेकाचं जीणं मु.पो.मारेगावचे मोक्षधाम झाले आहे.
मृत्यूनंतर अंतीमसंस्कार साठी आलेल्या पार्थिवावर दाहसंस्कारासाठी लाकडे पुरविणे , सरण रचून देण्याचे महत्वाकार्य बरडशेवाळा ता.हदगाव जी.नांदेड येथील २५ वर्षीय युवक ज्ञानेश्वर तुकाराम जाधव हा युवक करीत आहेत.नगरपंचायत प्रशासनाकडून नियुक्ती झालेल्या या पोटच्या गोळ्याला तगडी हिम्मत त्याची माय शांताबाई ही सावली सारखी उभी राहून आणि किर्रर्र अंधारात त्याला जगण्याचा प्रकाश देत आहे.
मृत्यू अन प्रेत म्हटलं की , आजही अनेकजण सुरक्षित अंतर ठेवून दरवाजे बंद करून घेण्याचे वास्तव टाळता येणारे नाही. मात्र ज्ञानेश्वर हा युवक थेट स्मशानभूमीलाच निवारा करून आयुष्य कंठण्याचे बेरजेत रूपांतर करीत आहे.भटकंती असलेल्या मसणजोगी समाजाचा या युवकास मारेगावात सरण रचण्याचे तोडक्या मानधनेवर काम मिळाले आहे.त्याचा थोरला भाऊ औरंगाबाद येथील स्मशानभूमीत कुटुंबाचा काफीला घेऊन काम करीत आहे.
मुसळधार पाऊस असो की कडाक्याचे उन अथवा बोचरी थंडी ज्ञानेश्वर स्मशानभूमीलाच आता घर समजून बिनधास्त जीवन जगत आहे. स्मशानभूमीत एरवी भूत , खेत असल्याचा भीतीपणा त्याला सुरुवातीलाच भितीदायक व वेगवेगळ्या पद्धतीचे स्वप्न पडीत असल्याने त्याने चांगलाच धसका घेतला होता.मात्र समाजातील वरिष्ठांना ज्ञानेश्वर याने विचारणा करून ऐन प्रेत जाळण्याच्या मधोमध ठिकाणी मध्यरात्री बसून 'स्मशानदेवता' 'बटुकभेरवा' यांची रक्षण करण्यासाठी शपथ घेतली.आणि माझ्या मनातील भितीदायक शहारे नष्ठ झाल्याचे ज्ञानेश्वर जाधव याने 'विदर्भ सर्च न्यूज नेटवर्क' शी बोलतांना सांगितले.
अवघ्या नववी वर्गापर्यंत शिक्षण घेतलेल्या ज्ञानेश्वर व त्याची आई शांताबाई मारेगावाच्या स्मशानभूमीत टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षातही जिवंतपणी स्मशानात भाकरीचा शोध घेत आहेत.