मार्डी रस्त्याची जड वाहतूक कायम बंद करा
🔸तहसील प्रशासन मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन
अक्षरशः खड्डे पडून दुचाकीस्वारांचे कंबरडे मोडणाऱ्या मार्डी मारेगाव रस्त्याची पुरती वाट लागली आहे.अशातच जड वाहतुकीची रीघ लागलेल्या रस्त्यावरील ही वाहतूक कायम बंद करून संभाव्य धोका टाळण्याची मागणी नगरसेवक आकाश बदकी यांच्या नेतृत्वात नागरीकांनी साकडे घातले आहे.
मारेगाव मार्डी हे दहा किमी.चे अंतर असून मार्डी परिसरातील अनेक गावांचा समावेश असलेल्या नागरिकांची नियमित मारेगाव तालुकास्तरावर वर्दळ असते.मात्र अवघ्या १५ मिनिटांचे हे अंतर तासांवर गेले आहे.यावरून या बिकट रस्त्याची कल्पना न केलेली बरी असे भयाण रस्त्याचे वास्तव आहे.
दरम्यान , या रस्त्याने जागोजागी खड्डे पडले असून गिट्टी पूर्णतः उखडली आहे.चार चाकी सह दुचाकीस्वारांना येजा करणे कठीण होत आहे.या रस्त्याने अनेकांना किरकोळ अपघात होऊन मणक्याच्या आजाराने विळखा घातला आहे.
परिणामी , खड्डा की रस्ता ही संभ्रमावस्था असलेल्या खड्डेमय रस्त्याला भरीसभर म्हणून जड वाहतुकीचे ग्रहण लागले आहे.अवैध कोळशाचे ट्रक धावणाऱ्या रस्त्याची बिकट अवस्थेला प्रशासनासह लोकप्रतिनिधी जबाबदार असून ही वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावे व रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी तहसीलदार दीपक पुंडे यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना आज शुक्रवार ला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.