नियतीचा असाही पाठलाग..
अनाथ राजुच्या घराला आगीने घेतले कवेत
🔸अन्नधान्य , पैशासह स्वप्नांची राखरांगोळी
🔸मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील घटना
कोरोना या भयावह संकटात मातृपितृ छत्र हरविले.एकुलत्या एका मुलामागे समस्याचा डोंगर उभा.मोलमजुरी करून दिवस कंठायचे.हा दृढनिश्चय करीत दिवाळीचा सण सर्वत्र साजरा होत असतांना ऐन दिवाळीत राजुच्या घरावर नियतीने डाव साधला अन अख्ख घर आगीने कवेत घेत घरातील धान्य सह पाच हजार रुपयांच्या पैशाची क्षणात राखरांगोळी झाली.
ही घटना मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे दि.२७ ला घडली आणि दारिद्र्यात पिचत पडलेल्या राजूवर नवे संकट उभे ठाकले.
मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील राजू महादेव आसुटकर मोलमजुरी करून जीवन जगतोय.कोरोना महामारीत आई वडिलांवर नियतीने डाव साधला.अन राजूला पोरके केले.
दिवाळी निमित्त आपलीही चंद्रमौळी झोपडीत किमान चार दिवस प्रकाशमान होईल या उदात्त हेतूने दिवे लावले.दिवे लावून फेरफटका मारावा म्हणून रस्त्यालगत गेला आणि इथेच ठिणगी पडली.काही कळण्यापूर्वीच अख्ख घर आगीने कवेत घेतले व घरातील इतर साहित्यासह पैशासह स्वप्नांची राखरांगोळी झाली.
संकटाचा ससेमिरा सुरू असतांना हे नवे संकट राजुसमोर आ वासून उभे आहे.प्रशासनाने थोडी तसदी घेऊन किमान मदतीसाठी प्रयत्न व्हावा अशी आर्त हाक राजू शून्यात बघून देत आहे.