क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयास १०० पुस्तकांची भेट
येथील नामांकित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, विठ्ठलवाडी वणी या वाचनालयास सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे वाचनप्रेमी मा.श्री.संजय गोडे यांनी शंभर पुस्तके भेट म्हणून दिली असून त्यांचा स्वीकार वाचनालयाचे सहाय्यक ग्रंथपाल श्री.शुभम कडू यांनी केला. पुस्तकांचा उपयोग वाचकांना होण्यासाठी वाचनालय हे एक आदर्श ठिकाण असून वाचनाइतकेच ग्रंथदानही सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे वाटल्याने आपण ही ग्रंथ भेट देत असल्याचे यावेळी संजय गोडे यांनी सांगितले. तसेच पुस्तकांसारखी संपत्ती या जगात दुसरी कोणतीच नाही कारण खूप पैसे मिळवू, गाडी घेऊ, बंगला घेऊ पण हे कधीतरी संपणार आहेत, ही पुस्तके मात्र कायमची संपत्ती आहे इतिहास आहे, पूर्वजांचा ठेवा आहे, पुस्तके हे नेहमी आपल्याला मार्गदर्शन करत असतात असे सहाय्यक ग्रंथपाल शुभम कडू यांनी सांगितले आणि संजय गोडे यांचे आभार मानले. यावेळी वाचनालयातील वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.