Type Here to Get Search Results !

वणीत "व्हॉइस ऑफ डिजिटल मीडीया" पत्रकार संघटनेचे निर्माण


🔶राज्याचे माहिती आयुक्त मा. राहुल पांडे करणार उद्घाटन
🔶सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची असणार उपस्थिती


वणी : पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. आणि याच पत्रकारितेची बदललेली माध्यमे बदलत्या जगासमोर आव्हान म्हणून उभी ठाकली आहे. हीच बदललेली माध्यमे आणि शासनाची भूमिका स्पष्टपणे पुढे यावी म्हणून, पत्रकार संघटना वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करताना दिसते आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे, वणी उपविभागात निर्माण झालेली "व्हॉइस ऑफ डिजिटल मीडीया" पत्रकार संघटना. याच पत्रकार संघटनेचा उद्घाटन सोहळा राज्याचे माहिती आयुक्त मा. राहुल पांडे यांचे हस्ते वणीच्या भूमीत 26 फेब्रुवारीला होत आहे.

विशेष म्हणजे उद्घाटन सोहळ्याला लोकसत्ताचे संपादक, प्रसिद्ध विचारवंत, व्याख्याते मा. देवेंद्र गावंडे उद्घाटक वक्ते असणार आहेत. तर तरुण भारत डिजिटल मीडियाचे संपादक मा. शैलेश पांडे यांचे अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. विशेष अतिथी म्हणून चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. बाळूभाऊ धानोरकर, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराज अहीर, वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष मा. राजू उंबरकर, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य मा. विजयबाबू चोरडिया, दि वसंत जिनिंग वणीचे अध्यक्ष मा. आशिष खूलसंगे यांची उद्घाटन सोहळ्याला विशेष उपस्थिती असणार आहे.

वणी शहराच्या दी वसंत जिनिंग सभागृहात 26 फेब्रुवारीला संपन्न होणाऱ्या उद्घाटन सोहळ्या पूर्वी 25 फेब्रुवारीला नवोदित पत्रकार, पत्रकारिता क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या आणि समाजातल्या जाणत्या वर्गासह शिक्षक, वकील यांच्यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि वसंत जिनिंग चे अध्यक्ष मा. आशिष खूलसंगे यांचे हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे कार्यशाळेचे अध्यक्ष असणार आहेत. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरचे संचालक मा. पी एस आंबटकर, वणी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मा. तारेंद्र बोर्डे, तसेच श्री रंगनाथ स्वामी अर्बन निधीचे संचालक मा. संजय खाडे यांच्या विशेष उपस्थितीत कार्यशाळा संपन्न होणार आहे.


आयोजित कार्यशाळेला ख्यातनाम व्याख्याते मा. दीपक रंगारी यांचेसह प्रसिद्ध विधीज्ञ मा. कल्याण कुमार कार्यशाळेला व्याख्याते म्हणून असणार आहे. मराठी भाषा व्याकरण आणि पत्रकारिता यासह डिजिटल मीडिया आणि कायदा या विषयावर आयोजित कार्यशाळेत वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

पत्रकारिता क्षेत्रातील बदललेली माध्यमे आणि डिजिटल मीडियाचे माध्यमातून उभी ठाकलेली आव्हाने, याबरोबरच शासन प्रशासन आणि सरकारची भूमिका समजून घेण्याची सुवर्णसंधी, आयोजित कार्यशाळा व उद्घाटन सोहळ्याचे निमित्ताने विभागातल्या जाणत्या माणसांपर्यंत पोहोचविण्याचे काम, नव्याने निर्माण झालेल्या "व्हॉइस ऑफ डिजिटल मीडिया" या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून होत आहे. आयोजित कार्यशाळा व उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या घटनेचे कौतुक सर्व स्तरातून होताना दिसते आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies