भरधाव पिकपचा टायर फुटल्यामुळे पिकअप एका दुचाकीला धडकली. ही घटना इतकी भीषण होती कि यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना वणी -यवतमाळ राज्य महार्गावरील गोविंद राजा कोटेक्स जवळ दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी शुक्रवारला रात्री ८:३० वाजताचे दरम्यान घडली.रवींद्र हरिदास कोरझरे वय अंदाजे ३५ वर्ष रा. सालेभट्टी ता. मारेगाव असे अपघातात जागीच ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
तो नरसाळा येथील खदान येथे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. दिवसभर ट्रकवर काम करून सायंकाळी आपल्या दुचाकीने नरसाळा येथून सालेभट्टी येथे जात असताना गोविंद राजा कोटेक्स जवळ पिकचा टायर फुटल्यामुळे पिकअपने त्याच्या दुचाकीला धडक दिली.यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्याचा जागीच मृत्यू झाला. मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळ पंचनामा करून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. रवींद्रच्या पश्च्यात पत्नी आणि तीन मुली आहेत.