वणी विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रत्येक उमेदवार आपआपल्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे. या सर्वांमध्ये अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा प्रचार मात्र विशेष लक्षवेधी ठरला आहे. “जनता हीच माझी माय-बाप, त्यांनी मला आशीर्वाद द्यावा,” असे उद्गार काढून खाडे यांनी जनतेशी भावनिक संवाद साधला आहे.
संजय खाडे यांच्या प्रचाराच्या यंत्रणेत कार्यकर्त्यांची एक उत्तुंग ताकद दिसून येत आहे. नुकतेच मुकुटबन येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, जिथे हजारोंच्या संख्येने नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. त्यांच्या प्रचाराचा उत्साह, ठराविक पक्षीय उमेदवारांच्या प्रचार रॅलींपेक्षाही अधिक ऊर्जावान आणि व्यापक होता, ज्यामुळे खाडे यांना स्थानिक नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.
वणी विधानसभेत खाडे यांना अनेक प्रबळ नेत्यांचे समर्थन मिळाले आहे. माजी आमदार विश्वास नांदेकर, ज्यांची वणी आणि आसपासच्या भागात प्रचंड लोकप्रियता आहे, त्यांनी खाडे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचा प्रचार करत आहेत. त्याचप्रमाणे नरेंद्र ठाकरे व गौरीशंकर खुराणा हेही खाडे यांच्यासाठी प्रचारात सक्रीय आहेत. मारेगाव तालुक्यात ठाकरे व खुराणा यांचा प्रभाव चांगलाच जाणवतो, ज्यामुळे तालुक्यात ‘शिट्टी’ चा आवाज अधिकच गाजू लागला आहे.
संजय खाडे यांचा प्रचार "शिट्टी" या प्रतिकात्मक घोषणेवर आधारलेला आहे, ज्याचा आवाज आता संपूर्ण वणी विधानसभेत गाजू लागला आहे. "शिट्टी" हे प्रतीक ज्या प्रकारे त्यांची ओळख ठरले आहे, ते पाहता मतदारसंघात या प्रतिमेने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळे खाडे यांची प्रतिमा एक आक्रमक आणि सर्वसामान्यांशी जोडणारा नेता अशी होत आहे.