Type Here to Get Search Results !

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर


▪️ संजय खाडे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन, रोड शोने वेधले वणीकरांचे लक्ष
▪️ मतदारसंघात विकास नाही तर भकास, संजय खाडे यांचा हल्लाबोल

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे उसळला होता. वाजत गाजत निघालेल्या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. संपूर्ण वणी शहर शिट्टीच्या आवाजाने निनादून गेले. रॅलीत माजी आमदार विश्वास नांदेकर, नरेंद्र ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी झालेल्या सभेत संजय खाडे यांनी आमदारांवर जोरदार तोफ डागत मतदारसंघाचा विकास नाही तर भकास झाला, असा हल्लाबोल केला.

जत्रा मैदान जवळील हनुमान मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली. ढोलताशा, डफडे, गोंडी वाद्यवृंद, डीजेच्या गजरात व कार्यकर्त्यांच्या जल्लोषात रॅली निघाली. रॅलीच्या सुरुवातीला महिलांचा ताफा होता. त्यानंतर सजवल्या बग्गीत संजय खाडे हे विश्वास नांदेकर, नरेंद्र ठाकरे व इतर मान्यवरांसह उपस्थित होते. सुमारे एक किलोमीटर लांब ही रॅली होती. यावेळी खाडे समर्थकांनी केलेल्या शिट्टीच्या आवाजाने संपूर्ण शहर निनादून गेले. टिळक चौक येथे छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर खाती चौक, गांधी चौक, काठेड ऑईल मील असा मार्गक्रमण करीत जत्रा मैदान य़ेथे रॅलीची सांगता झाली. त्यानंतर रॅलीचे रुपांतर भव्य सभेत झाले. सभेत खाडे यांनी आमदार व देरकर यांच्यावर तोफ डागली.

मतदारसंघात विकास नाही तर भकास - संजय खाडे
मतदारसंघात 2 हजार कोटींचा विकास झाल्याचा दावा केला जातो. मात्र हा दावा सपशेल फोल आहे. विकास असेल, तर दिसत का नाही? ज्या ठिकाणी थोडाबहुत विकास दिसतो. ते काम ही निकृष्ट दर्जाचे आहे. मर्जीतील लोकांना कंत्राट देऊन विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केला गेला. हा विकास नाही तर भकास आहे. शेतक-यांच्या आत्महत्या होत असताना गेल्या 10 वर्षात एकदाही शेतक-यांचा आवाज विधानसभेत उचलला नाही. यावेळी त्यांनी देरकर यांच्यावरही तोफ डागली. पाच वर्ष कधीही न दिसणारे नेते अचानक निवडणुकीच्या तोंडावर प्रकट होतात. मात्र मतदार सुज्ञ आहे. ते सक्रिय निष्क्रीय उमेदवार बरोबर ओळखतात, असे ही ते म्हणाले.

शेतक-यांसाठी पांदण रस्ते, हमी भाव, युवकांना व्यायामशाळा, बचत गटांना स्वयंपूर्ण बनवणे, भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, परिसरात नवीन उद्योग आणणे, गाव तिथे अभ्यासिका तयार करणे, मजबूत रस्ते बांधणे, शहर व मतदारसंघ प्रदूषणमुक्त करणे इत्यादी मतदारसंघासाठी व्हिजन असल्याचे खाडे यांनी सांगितले. सभेत बोलताना विश्वास नांदेकर यांनी देरकर यांच्यावर तोफ डागली. तर नरेंद्र ठाकरे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी सोबत राहावे, असे आवाहन केले.


रॅलीत प्रमोद वासेकर, गौरीशंकर खुराणा, संजय आवारी, चंद्रकांत घुगुल, प्रसाद ठाकरे, पुरुषोत्तम आवारी, बंडू सिडाम, प्रशांत गोहोकर, वासुदेव विधाते, पवन एकरे, किरण नांदेकर, सीमा आवारी, काजल शेख इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीत वणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies