पाटण पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दुर्भा येथील अशोक दयालाल भेदोडकर याचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना १४ नोव्हेंबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दुर्भा रस्त्यावरील गोटाडी नाल्याच्या पुलाजवळ रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह पडून होता. या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना अशोक भेदोडकर हा मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी ही माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतकाच्या गळ्यावरील घाव बघता त्याची तीक्ष्ण अवजाराने गळा चिरून हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला.
पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून अवघ्या काही तासांतच खुनाच्या या घटनेचा पर्दाफाश केला. शीघ्र तपासचक्रे फिरवून गुन्हे शाखा पथकाने दोन संशयितांना अटक केली. त्यांना पोपटासारखं बोलतं केलं. त्यांनी खुनातील मुख्य आरोपी व त्याच्या साथीदाराचे नाव सांगितले. ते दोघेही नांदेड येथून दूर पळून जाण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी पथकाला सांगितले. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने क्षणाचाही विलंब न करता नांदेड गाठले. नांदेड रेल्वे स्टेशनवर सापळा रचून मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली. नवन अशोक बदद्लवार या आरोपीने आपले साथीदार कैलास बोडके, अरुण झांबरे, अनिल आवशे यांच्या मदतीने अशोक भेदोडकर याचा खून केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. खुनाचा कुठलाही अँगल समोर आलेला नसतांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करून अति शीघ्र या घटनेचा छडा लावला. अवघ्या काही तासांतच पथकाने चारही आरोपींना बेड्या ठोकल्या.