अर्जुनी शिवारातील जंगलात चारायला गेलेल्या गाईवर वाघाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 12 नोव्हेंबरला घडली असून, परिसरातील नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर वनविभागाकडे त्वरित कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.अर्जुनी येथील शेतकरी मंगेश मनोहर तोडासे यांच्या मालकीची जर्सी गाय नेहमीप्रमाणे इतर जनावरांसह चारण्यासाठी जंगलात गेली होती. इतर जनावरे सायंकाळी परत आली; मात्र मंगेश तोडासे यांची गाय घरी परतली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी इतरांसह जंगलात शोध घेतला असता, गाईचा मृतदेह आढळला. तिच्या शरीरावर मागून मोठे घाव आढळले, तर मानेवर वाघाच्या दातांचे आणि पंजांचे ठसे स्पष्ट दिसून आले.
मंगेश तोडासे यांची गाय दुधाळ होती आणि तिची किंमत साधारण 35 ते 40 हजार रुपये होती. वाघाच्या हल्ल्यात गाईचा मृत्यू झाल्याने त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. मंगेश तोडासे यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली असून, घटनास्थळी पंचनामा करून परिस्थितीची नोंद घेण्यात आलेली आहे.