वणी :- महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचार रॅलीत आज हजारोंच्या संख्येने रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी गर्दीचे सर्व रेकॉर्ड तोडले. रॅलीत समुदाय उमळला होता. शहरात आज भगवं वादळ उठलं होतं. जिकडे तिकडे भगवे झेंडे लहरत होते. भगव्या टोप्या घालून नागरिक रॅलीत सामील झाले होते. जय भवानी जय शिवाजीच्या जय घोषाने शहर दुमदुमले होते. या भव्य रॅलीने शहरवासीयांबरोबरच राजकीय वर्तुळाचेही लक्ष वेधले.रॅलीत महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
उसळलेला जनसागर हा परिवर्तनाची नांदी असल्याची एकच चर्चा शहरात रंगली होती. शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांचा आक्रोश या रॅलीतून दिसून आला. रॅलीत उसळलेल्या गर्दीने आज शहरातील रस्तेही अरुंद वाटत होते. जत्रा मैदान व दीपक चौपाटी मार्ग नागरिकांच्या गर्दीने फुलाला होता. जत्रा मैदान येथून रॅलीला सुरवात झाली. वेगवेगळे बॅण्ड पथक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने निघाली. टिळक चौक येथे ही रॅली पोहचल्यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. रॅलीत यवतमाळचे खासदार संजय देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित झाले होते.
खेड्यापाड्यातून नागरिक उलटून आले होते. महाविकास आघाडीनेही रॅली उचलून धरली. काँग्रेसचे सर्वच प्रमुख नेते रॅलीत सहभागी झाले होते. काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रॅलीत सहभाग घेतला. शिवसैनिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. तसेच राष्ट्रवादी व घटक पक्षांचेही नेते व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, आशिष खुलसंगे, टिकाराम कोंगरे, डॉ. महेंद्र लोढा, इजहार शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. राष्ट्वादीचे विजय नगराळे हे देखील रॅलीत सहभागी झाले होते. तसेच शिवसेनेचे संजय निखाडे, सुनिल कातकडे, दीपक कोकास, युवासेनेचे अजिंक्य शेंडे, भगवान मोहिते, राजेंद्र ईद्दे, प्रवीण खानझोडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. त्याच प्रमाणे सर्वच पक्षांच्या महिला पदाधिकारीही रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
खासदार संजय देशमुख यांनी शेतकऱ्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब या सरकार कडून घायचा आहे, अशी गर्जना या रॅलीतून केली. हे शेतकरी विरोधी सरकार महाराष्ट्र्रतून हद्दपार करायचं आहे. त्याकरिता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. महाविकास आघाडीचं सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंतच कर्ज माफ केलं जाईल. महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा ३ हजार रुपये देण्यात येईल. विमा सुरक्षा कवच २५ लाखांपर्यंत वाढविण्यात येईल. महाराष्ट्रात महिलांना एसटीचा प्रवास मोफत राहील. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यात येईल, हा महाविकास आघाडीचा वचननामा आहे, असेही संजय देशमुख जाहीरपणे सांगितले.