वणी – महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगक्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे. मात्र महायुती सरकार महाराष्ट्राऐवजी गुजरातला झुकते माप देऊन राज्यातील उद्योग गुजरातला पळवून नेत आहे. त्यामुळे याचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर तर परिणाम होत आहे. याशिवाय राज्यात बेरोजगारी वाढत आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकरी, रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात सत्ता परिवर्तन होणे गरजेचे आहे. त्यामुळे जनतेने एकजुटीने वणी व महाराष्ट्रात महाविकास आघाडीची वज्रमूठ मजबूत करावी, असे आवाहन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.
गुरुवारी शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ वसंत जिनिंग लॉनमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे, अंबादास वाघदरकर, उत्तम गेडाम, ॲड. देविदास काळे, वसंत जीनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे, किरण देरकर, जयसिंग गोहोकार, साधना गोहोकार, संध्या बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर माजी आमदार वामनराव कासावार हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.