विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचा खाडे यांना वाढता पाठिंबा
वणी - प्रतिनिधी
आम आदमी पार्टीच्या वणी विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. आम आदमी पार्टीचे शहर महासचिव दादाजी पोटे आणि वणी विधानसभा उपाध्यक्ष शेख जलील व कार्यकर्त्यांनी संजय खाडे यांची प्रचार कार्यालयात भेट घेत त्यांना पाठिंबा दिल्याची घोषणा केली. त्यांनी संजय खाडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
संजय खाडे यांनी उमेदवारी जाहीर करताच त्यांना विविध संघटना व संस्था पाठिंबा जाहीर करीत आहे. यात विविध समाजाच्या, शैक्षणिक इत्यादी संघटनांचा समावेश आहे. बुधवारी महाराष्ट्र ट्रायबल आघाडी या संघटनेच्या पदाधिका-यांनी भेट घेत पाठिंबा जाहीर केला. तर त्याआधी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ (अंगणवाडी विभाग) व गोंडवाना बहुउद्देशीय संस्था मारेगाव यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच मुस्लिम समाज कमिटीच्या सदस्यांनीही त्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
बुधवारी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी संजय खाडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. तेव्हापासून त्यांना रोज विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. सध्या काँग्रेस पक्षाचे अनेक प्रमुख नेते, शिवसेनेतील प्रमुख नेते, शिवसैनिकांचा खाडे पाठिंबा मिळत आहे. येत्या 4 दिवसात प्रचार शिगेला पोहोचताच संजय खाडे यांचा पाठिंबा आणखी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या माजी आमदार विश्वास नांदेकर, काँग्रेसचे नरेंद्र ठाकरे, गौरीशंकर खुराणा इत्यादी नेत्यांच्या मार्गदर्शनात संजय खाडे यांचा प्रचार सुरु आहे.