🔹 विविध संघटना व नेत्याचा खाडे यांना पाठिंबा
वणी - बुधवारी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा मार्डी सर्कलमध्ये प्रचाराचा झंझावात दिसून आला. सकाळी 8 वा. वनोजा देवी पासून प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर गोरज, दांडगाव, आपटी, मुक्टा, हिवरा, कानडा, शिवणी धोबे, चनोडा, चोपण, कानडा येथे दौरा करीत मार्डी येथे कॉर्नर सभेने मार्डी सर्कलच्या प्रचाराची सांगता झाली. त्यानंतर संजय खाडे यांचा झरी येथे दौरा झाला. बिरसा मुंडा चौकात कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. मार्डी व झरी येथील प्रचार सभेत माजी आमदार विश्वास नांदेकर व नरेंद्र ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान विविध आदिवासी संघटना व धनगर समाजाच्या नेत्यांनी संजय खाडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
सकाळी वनोजा देवी येथे देवीचे दर्शन घेऊन संजय खाडे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर प्रचार ताफा गोरज व दांडगाव येथे पोहोचला. तिथे भव्य रॅली काढण्यात आली. ढोलताशाच्या गजरात गावक-यांनी खाडे यांचे स्वागत केले. महिलांनी औक्षण करून संजय खाडे यांना विजयाचा आशीर्वाद दिला. रॅलीत संजय खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर प्रचार ताफा आपटी, मुक्टा, हिवरा, कानडा, शिवणी धोबे, चनोडा, चोपण, कानडा येथे दौरा करीत मार्डी येथे कॉर्नर सभा पार पडली.
⭆ शेतकरी सुखी असेल तर आत्महत्या का ? - संजय खाडे
भाजपच्या 10 वर्षांच्या काळात मतदारसंघात जो विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही. शेतक-यांना न्याय मिळाला नाही. शेतक-यांना वीज मिळत नाही. ग्रामीण भागात बसची समस्या आहे. बेरोजगारांची फौज परिसरात वाढत आहे. ग्रामीण भागातील रस्त्याची समस्या आहे. मारेगाव तालुक्यात शेतक-यांच्या सर्वांधिक आत्महत्या आहे. शेतकरी जर सुखी असता तर त्याला आत्महत्या का करावी लागते, असा सवाल त्यांनी सभेत उपस्थित केला. सभेत बोलताना नरेंद्र ठाकरे म्हणाले की संजय खाडे हे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहे. यावेळी काँग्रेस निवडणुकीत नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता नाराज आहे. काँग्रेस जिवंत राहण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता खाडे यांच्या पाठिशी उभा राहिल, असा विश्वास त्यांनी सभेत व्यक्त केला.
झरी येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हारार्पण करून कॉर्नर सभेला सुरुवात झाली. येथे संजय खाडे यांनी आदिवासी समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. मतदारसंघात अनेक मोठमोठाले विकासाचे दावे होत आहेत. मात्र अजूनही झरीसारख्या दुर्गम भागात, आदिवासी पोडात पुरेशा सोयी सुविधा अद्यापही पोहचल्या नाही. शिक्षण, आरोग्य सेवा, रस्ते, वीज, स्वच्छ पाणी या मूलभूत सुविधादेखील त्यांना मिळत नाही. आरोग्यासेवेसाठी त्यांना आजही बाहेरगावी जावे लागते असे ते म्हणाले.
⭆ विविध आदिवासी संघटना व धनगर नेत्याचा पाठिंबा
विविध आदिवासी संघटनांचा संजय खाडे यांना पाठिंबा वाढत आहे. गोंडवाना संग्राम पार्टीचे किशोर पंधरे, भारत मडावी, शांताराम दडांजे, गोंडवाना टारगर्स पार्टीचे तुळशीराम मंदाळे व सहकारी तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टीचे रवि गेडाम इत्यादी नेत्यांनी संजय खाडे यांची प्रचार कार्यालयात भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. तर धनगर समाजाचे नेते व खंडोबा वाघोबा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग पंडिले यांनी संजय खाडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. ते त्यांच्या समाजबांधवासह संजय खाडे यांचा प्रचारात सामील झाले.