मारेगाव तालुक्यातील गाडेगाव येथे शनिवारी सकाळी ८:३० वाजताच्या दरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात घरगुती साहित्यासह घरात ठेवलेली रोकड जळून खाक झाली होती. त्या पीडित परिवाराला तात्पुरती आर्थिक मदत व्हावी यासाठी वणी येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांनी ११ हजार १११ रुपयांची तात्काळ मदत केली.
भारत दाते हे आपल्या परिवारासह गाडेगाव येथे वास्तव्यास आहेत. सकाळी चहा पाणी झाल्यानंतर ते आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. काही कळण्याच्या आत संपूर्ण घराला आगीने विळखा घातला. घरातील महत्वाचे साहित्य भस्मसात झाले. तर घरात ठेवलेली रोकड जळून खाक झाली. या घटनेत तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलल्याजात आहे.
ही बाब येथील उमेश पोद्दार यांना समजली, त्यांच्यातील माणुसकी गहिवरली, सकाळपासूनच त्या आपत्तीग्रस्त परिवाराला मदत करण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती. अखेर शिवसेना उबाठा चे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे हे घटनास्थळी असल्याचे कळताच त्यांचे सोबत संपर्क साधून रक्कम पाठविण्यात आली. पोद्दार यांनी पाठविलेल्या मदतीने तो परिवार गहिवरून गेला.